पुणे,दि.१७:-पुण्यात पीएमपी बसमधून प्रवास करताना पोलिसांना आता पुणे शहर,व पिंपरी चिंचवड परिसरात तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे. कारण, पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी यासंदर्भातील आदेश नुकतेच जारी केले आहेत.पीएमपीच्या बसगाड्यांमधून पोलिस कर्मचारी कामानिमित्त मोफत प्रवास करतात. या प्रवास खर्चापोटी राज्य सरकारच्या गृहविभागाकडून अनुदान दिले जाते. पोलिसांचा पीएमपीमधून मोफत प्रवास मार्च 1991 पासून सुरू करण्यात आला होता.
मात्र, आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार पुणे पोलिसांचा पीएमपी बसमधून होणारा मोफत प्रवास आता बंद करण्यात आला आहे. यासंदर्भात पीएमपी प्रशासनाने पीएमपी वाहक, तिकीट तपासणीस, पर्यवेक्षकीय सेवकांना आदेश दिले आहेत. दरम्यान, मोफत प्रवासाच्या बदल्यात पोलिस प्रशासनाकडून पीएमपीला देण्यात येणारे अनुदान वेळोवेळी मिळत नव्हते. हे अनुदान मिळविण्यासाठी पीएमपी प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार करावा लागत असे. लाखो रुपये अनुदान मिळत नसल्याने पीएमपीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे.