पुणे,दि.१०:- पुणे शहरांतील गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांना यावर्षी पासून पुढील पाच वर्षांचा परवाना देण्यात येणार आहे. तर, मंडळांसाठी पुणे महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे. त्यात मंडळाचे मांडव, मंडळाबाहेरील जाहिराती, जाहिरात कमानी तसेच गणेशोत्सवानंतर मंडळांनी मांडव काढून रस्ते पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.गणेश मंडपाची कमीत कमी उंची ४० फुटांपेक्षा जास्त नसावी. असेल, तर स्थैर्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. मंडळाला मंडपापासून ५० रनिंग मीटरपेक्षा जास्त जाहिरात लावता येणार नाहीत. या जाहिरातीचा काही भाग पुणे महापालिकेच्या जाहिरातीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक असेल. दरम्यान, यावर्षी गणेशोत्सव
दि. ३१ ऑगस्ट-९ सप्टेंबरदरम्यान होणार आहे.पुणे महापालिका व पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पोलीस व पालिकेतील अधिकाऱ्यांसह मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत पुणे पालिकेने मंडळांना नियमांची माहिती दिली.
मंडळांसाठी महत्त्वाचे नियम
मंडप, स्टेज, कमानी, रनिंग मांडवाची झालर यावर जाहिराती लावण्यासाठी महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाची परवानगी आवश्यक.
वाहतूक पोलीस आणि पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्रासह मुख्य मांडवापासून दोन्ही बाजूस 50 मीटर अंतरापर्यंतच अधिकृत जाहिराती लावता येतील.
या अंतरात एकापेक्षा अधिक मंडळे असल्यास त्यांना समप्रमाणात जागा विभागून दिली जाईल.
स्वागत कमानींची उंची 18 फुटांहून अधिक असावी. मांडवांची उंची 40 फुटांपेक्षा अधिक नको. त्याहून अधिक मंडपासाठी सिव्हिल इंजिनिअरचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
अधिकृत परवान्यांची प्रत मांडवाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक असेल.
गणेशोत्सव संपल्यानंतर तीन दिवसांच्या आत मांडव, देखाव्याचे बांधकाम, साहित्य, रनिंग मांडव, गाडे हटवावेत.