पुणे दि,७ :- सक्षमीकरणाकरीता पीक पेरणीची माहिती मोबाईलवर ॲपद्वारे गाव नमुना नं.१२ मध्ये शेतक-यांनी स्वत: नोंदविण्याचा प्रकल्पांतर्गत ई पिक पाहणी ( Mobile App) कार्यशाळेचे आयोजन येथील कवी मोरोपंत नाटयगृह येथे करण्यात आले होते. यावेळी प्रकल्प सल्लागार टाटा ट्रस्टचे श्री.नरेंद्र कवडे (से. नि. भा.प्र.से), ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणेचे श्री.रामदास जगताप, प्रांताधिकारी हेमंत निकम, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.बालाजी ताटे, गट विकास अधिकारी श्री.प्रमोद काळे, तालुका कृषी अधिकारी श्री.पडवळ इ.मान्यवर उपस्थित होते.
क्षेत्रीय स्तरावरुन पीक पेरणीची अद्ययावत आकडेवारी तातडीने संकलित करणे, यामध्ये पारदर्शकता आणणे आणि या पीक पाहणीच्या प्रक्रीयेमध्ये शेतक-यांचा सक्रीय सहभाग घेणे इत्यादी उद्दीष्टाकरीता पीक पेरणीची आकडेवारी मोबाईलवर ॲपद्वारा गांव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्याची सुविधा शेतक-यांना उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शासनाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ.जयंत कुमार बांठिया यांच्या मार्गदर्शनाखाली ई पीक पाहणी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मा.मुख्यमंत्री यांच्या दि.१० मे २०१८ रोजीच्या पत्रान्वये यास मान्यता देण्यात येवून शासनाच्या महसूल आणि वन विभागाकडून १० सप्टेंबर २०१८ रोजी याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित झाला आहे
या ई पीक पाहणी पथदर्शी प्रकल्पांतर्गत मोबाईल ॲपद्वारा पीक पेरणीची आकडेवारी घेण्यासाठी राज्यातील ६ विभागांतर्गत ६ तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुणे महसूली विभागांतर्गत बारामती तालुक्याची निवड झाली आहे. तालुक्यामध्ये सदरचे कामकाज शेतकऱ्यांनी करण्यासाठी ॲपबाबतचे आवश्यक ते प्रशिक्षण देण्याकरीता कवी मोरोपंत पिंगळे नाटयगृह, बारामती येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहायक,ग्रामसेवक तसेच शेतक-यांना पीक पेरणीची माहिती नोंदविण्याचे प्रशिक्षण देण्यात येवून त्यांच्या मोबाईल मध्ये हे ॲप डाऊनलोड करण्यात आले.
या ई पीक पाहणी ॲपद्वारे पीक अहवाल प्रक्रीयेमध्ये शेतक-यांचा सक्रीय सहभाग राहणार आहे त्यामुळे अचूक आणि विश्वसनीय पीक माहिती आधारे कार्यक्षम धोरण आखण्यास मदत होईल. यामुळे पीक विमा योजनांसारख्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सुलभता येईल. पीक विम्याचे दावे निपटारा करण्याची प्रक्रीया सुलभ रितीने होईल. पीकांची आपत्तीमुळे हानी / नुकसान झाल्यास त्यांना कार्यक्षमतेने मदत करता येणे शक्य होईल. शेतक-यांना हवामान, किडींचा प्रार्दूभाव आणि इतर रोगांच्या उपचारासाठी त्यांना तातडीचे संदेश देणे शक्य होईल तसेच अचूक माहितीच्या आधारे – शासकीय निर्णय प्रक्रीया आणि नियोजन सुलभ होईल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार हनुमंत पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन महसूल नायब तहसिलदार संजय पांढरपट्टे यांनी केले.
० ० ० ०