पुणे,दि.२४:- दिनांक २५ एप्रिल २०२२ ते ०२ मे २०२२ दरम्यान पुणे शहरातील वय वर्षे १ ते १९ या वयोगटातील सर्व मुला-मुलींना संस्था स्तरावर म्हणजे शाळांमध्ये आणि शाळा बाह्य मुला-मुलींना समुदाय स्तरावर घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वाटप पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे. १ ते १९ वर्षे वयोगटातील अंगणवाडी मध्ये जाणाऱ्या, शाळेत जाणाऱ्या व महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या सर्व मुला-मुलींना जंतसंसर्गाच्या प्रादुर्भावामुळे होणारे कुपोषण , रक्तक्षय , या सारखे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत जंतनाशक दिन मोहीम हा उपक्रम दर सहा महिन्यातून एकदा राबवण्यात येतो. जंतनाशक दिन मोहिमे अंतर्गत लहान मुलामुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करून लहान बालकांचे व विद्यार्थ्यांचे होणारे शारीरिक, शैक्षणिक व मानसिक नुकसान कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. सदर मोहिमे अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधील सर्व शासकीय शाळा, खाजगी शाळा, आश्रम शाळा, आर्मी स्कूल, सीबीएससी स्कूल, नवोदय विद्यालय, मिशनरी स्कूल, गुरुकुल, संस्कार केंद्रे व मदरसे येथे शिकणाऱ्या सर्व मुला-मुलींना दिनांक २५ एप्रिल २०२२ रोजी जंतनाशक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. अंगणवाडी, शाळा व महाविद्यालय येथे शिकणाऱ्या मुलांना शाळेतील शिक्षकांमार्फत तसेच शाळाबाह्य मुलांना पुणे महानगरपालिकेच्या आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी व क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत समन्वय साधला जाणार आहे. सर्व मुलामुलींनी दिनांक २५ एप्रिल २०२२ रोजी जंतनाशक गोळ्या घ्याव्यात व ज्यांना त्या दिवशी घेता येणार नाहीत त्यांनी दिनांक २९ एप्रिल २०२२ या मॉप अप च्या दिवशी जंतनाशक गोळ्या घ्याव्यात असे आवाहन माननीय आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी केले आहे.