पुणे, दि.०५ :- शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या आज पुणे आले होते.यावेळी त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पुणे महापालिका परिसरात असताना सोमय्या यांना काही शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळले. यात त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
किरीट सोमय्या यांना सध्या पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पुणे महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळल्याने सोमय्यांच्या जबर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. व शिवसैनिक सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. काहीजण कारसमोर आडवे पडून सोमय्या यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. एका व्यक्तीनं तर सोमय्यांच्या कारची काच फोडण्याचा प्रयत्न केल्याचंही व्हिडिओतून समोर आलं आहे.