पुणे, दि.२८ :- पुणे परिसरातील सिंहगड रोड येथे दहशत पसरवणारा गुन्हेगार आकाश विश्वनाथ काळरामे (वय-24 रा.चव्हाण चाळ, धायरी- याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील काही दिवसात तब्बल 55 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
आकाश काळरामे याला एमपीडीए कायद्यान्वये नागपुर कारागृहात एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे. आरोपी हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयता, लोखंडी रॉड यासारख्या हत्यारांसह दरोडा, जबरी चोरी, दुखापत, विनापरवाना हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 05 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आकाश काळरामे याच्यावर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसुफ शेख, पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी ही कामगिरी केली.
पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 55 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे.
त्यानुसार गुन्हेगारांवर मोक्का तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.