पुणे, दि.१० :- पुणे शहरात खासगी सावकारांकडून कर्जाची वसुली करण्यासाठी तगदा लावला जाणाऱ्या. सावकाराकडून होत असलेल्या आडमाप व्याज वसुलीच्या संदर्भात पोलिसांकडे अनेक तक्रारी येत आहेत.खासगी सावकारीला आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी हेल्पलाइन सुरु केली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असून हेल्पलाईनवर आलेल्या 12 तक्रारीवरुन 7 खासगी सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.पुणे शहरात खासगी सावकाराकडून अडचणीत सापडेल्यांना दरमहा 5 ते 10 टक्के दराने कर्ज दिले जाते. त्यानंतर हे सावकार आडमाप व चक्र व्याज पद्धतीने व्याजवसुली करुन कर्जदाराची आर्थिक पिळवणूक करतात. व्याजाचे पैसे देण्यास उशीर झाला तर कुटुंबीयांना देखील त्रास दिला जातो. यामधून पुणे शहरात गुन्हे देखील घडले. घेतलेले कर्ज आणि व्याज परत करताना कर्जदाराला तारेवरची कसरत करावी लागत होती. नोकरी आणि उद्योगधंद्यातून मिळालेली रक्कम सावकाराच्या खिशात जात असल्याच्या तक्रारी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कानावर गेल्या. त्यानंतर त्यांनी अवैध सावकरी करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला.पुणे पोलिसांकडून अवैध सावकारी करणाऱ्यांची माहिती देण्यासाठी नागरिकांना हेल्पलाईन क्रमांक 9145003100 उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या क्रमांकावर सुरु असलेल्या व्हॉट्सअॅपवर देखील नागरिक तक्रार करु शकतात. तसेच या क्रमांकाची सोशल मीडियावर प्रसिद्धी केली होती. पुणे पोलिसांनी खासगी सावकारांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर हेल्पलाईन क्रमांकावर 12 पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत.
हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींची पोलीस उपायुक्तांमार्फत पडताळणी केली जाते.त्यानंतर अवैध सावकारी करणाऱ्यावर कारवाई केली जाते.
मागील महिन्यात आलेल्या तक्रारीपैकी 7 सावकारांवर गुन्हे दाखल करुन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.या सावकारांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी कायदा कलम व भारतीय दंड विधान कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून ही कारवाई सुरु आहे.अवैध सावकारी करणाऱ्याची माहिती देण्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या हेल्पलाईनचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.पोलिसांकडून होत असलेल्या या कारवाईमुळे खासगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत.या कारवाई संदर्भात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, शहरामध्ये अवैध सावकारी करुन सर्वसामान्यांकडून जास्तीचे व्याज वसूल करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे.या क्रमांकावर आलेल्या तक्रारीची पडताळणी करुन खासगी सावकाराविरुद्ध कारवाई केली जात आहे.ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.