श्रीगोंदा,दि१६ :- तालुक्यातील मढेवडगांव येथे श्रीगोंदा रस्त्याच्या बाजूला गायरान हद्दीत गट न.८ मध्ये गुरुवारी सायंकाळी एका अज्ञात ३०-३२ वर्षीय इसमाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे.मृताची ओळख पटलेली नाही मात्र तोंडाचे श्वापदाने लचके तोडल्याने खून झाल्याचा कयास आहे.घटनास्थळी परिसरातील नागरिकांची गर्दी वाढली असून मृत व्यक्ती कोण ?अशी चर्चा बघ्यामध्ये सुरु झाली आहे.त्याच्या अंगावर गुलाबी रंगाचा शर्ट व पॅन्ट होती.
याबाबत अधिक माहिती अशी कि,मढेवडगांव येथील गायरान हद्दीत श्रीगोंदा रोडच्या बाजूला अज्ञात ३०-३२ वर्षीय इसम मृत पडल्याचे गुरुवारी सायंकाळी उघडकीस आले.काही नागरिकांनी त्याबाबतची माहिती पोलिसांना दिली.त्याअनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक अमित माळी,बीट अंमलदार झुंजार,योगेश भापकर ,घोंगडे आदी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.याआधी २४ ऑक्टोबरला देखील नगर दौंड महामार्गालगत शिरसगांव हद्दीत अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला होता. आता मढेवडगांव हद्दीत अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक इसमाचा अंदाजे दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचे दिसून आले व मृतक इसमाच्या तोंडाचे श्वापदाने लचके तोडल्याचे दिसून येते.असे पोलिसांनी सांगितले या घटनेमुळे मढेवडगांव मध्ये एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास सुरू आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे