पिंपरी-चिंचवड,दि,११:- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सादर केलेला प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा नियमानुसार झाला आहे की नाही? हे तपासण्यात येणार आहे.राज्य निवडणूक आयोगासमोर आज (शनिवारी) आराखड्याचे सादरीकरण केले जाणार आहे. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचना हरकती, सूचनांसाठी जाहीर केली जाणार आहे.महापालिकेची 2022 ची निवडणूक तीन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने होणार आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा तयार केला. निवडणूक विभागाने तो आराखडा सोमवारी (दि.6) राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. आता आयोगाकडून आराखडा कधी येईल, सर्वांसाठी कधी प्रसिद्ध होईल, प्रभाग रचना कधी जाहीर याची सर्वांना उत्सुकता लागली होती.महापालिकेने सादर केलेल्या प्रारूप रचनेचे सादरीकरण करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना आज मुंबईला बोलविण्यात आले आहे. हे सादरीकरण करताना प्रभागात लोकसंख्या योग्य प्रमाणात आहे का?, नैसर्गिक प्रवाह, रस्ते, उड्डाणपूल सीमा मानून रचना केली आहे का ? याची तपासणी केली जाईल. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान स्वत: आराखडा तपासणार आहेत. आयोगाच्या मंजुरीनंतर प्रारूप प्रभाग रचना हरकती, सूचनांसाठी जाहीर केली जाणार आहे. प्रभाग रचनेच्या कच्च्या प्रारुप आराखड्याचे आज (शनिवारी) राज्य निवडणूक आयोगासमोर सादरीकरण असल्याचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी’ सांगितले.