पुणे, 16 सप्टेंबर – पुण्यातील शनिवारवाडा कसबा पेठ येथील सह्याद्री ग्रुपच्या सूर्य हॉस्पिटलमधील कायम कर्मचा-यांच्या वेतनवाढीचा 1 जानेवारी 21 पासून करार करण्यात आला. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटल व्यवस्थापनाशी हा करार झाला. त्यामुळे दोन वर्षांपासून कोरोना काळात काम करणा-या कोरोना योद्ध्यांच्या वेतनात 10 हजार रुपयांनी भरघोस वाढ झाली.
हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या वतीने सह्याद्री ग्रुपचे सल्लागार सदानंद बापट, डॉ.. जयशिंग शिंदे यांनी तर कर्मचा-यांच्यावतीने यशवंतभाऊ भोसले, हॉस्पिटलमधील कामगार प्रतिनिधी गीता राजपुरे, चंदा पवार, किरण साकोरे, गणेश पवार, हर्षदा जाधव, जयवंत महागडे यांनी सहभाग घेतला. या करारामुळे 1 जानेवारी 2021 पासून पुढील 3 वर्षांकरिता पहिल्या पगारापासून एकाच टप्प्यात एकदम 10 हजार रुपये थेटवाढ कर्मचा-यांच्या वेतनात मिळाली. तसेच मागील 8 महिन्यांचा वेतनवाढीचा फरकही कर्मचा-यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. यामुळे कर्मचा-यांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता. भरघोस वेतनवाढ मिळाल्याने कोरोना योद्ध्यांनी यशवंतभाऊ भोसले आणि हॉस्पिटल व्यवस्थापनाचे आभार मानले.
”कोरोना महामारीच्या काळात या योद्ध्यांनी जीवावर उदार होऊन काम केले. आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. या कोरोना योद्ध्यांना भरघोस वेतनवाढ दिल्याबद्दल हॉस्पिटल व्यवस्थापनाचे आम्ही आभारी आहोत”, असे कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले.