पुणे दि १३ :- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गुढीपाडव्याला आकर्षक सजावट केली जाते.यंदा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मंदिर बंद असल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी बाहेरूनच दर्शनाचा लाभ घेतला
गणपती मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. मंदिराचा यावर्षी ३८ वा वर्धापन दिन आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचा संगीत महोत्सव व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याला मंदिराला आकर्षक सजावट केली जाते. तसेच भाविकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळते.यंदा मंदिरा बाहेरूनच दर्शन असल्याने भाविकांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. संपूर्ण विश्वावरचे कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना विश्वस्तांनी गणराया चरणी केली. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक कार्यक्रमदेखील पार पडले. तसेच पारंपरिक पध्दतीने गुढी उभारण्यात आली.
मंदिर बंद असले तरीही दैनंदिन धार्मिक विधी मंदिरात सुरु राहणार आहेत. भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा आॅनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी आॅनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी.
भक्तांकरीता घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.