पुणे दि ०१:- कोरोना लसीकरणा चौथा टप्पा सुरु झाल्यानंतर आता लसीकरण मोहिमेला व्यापक स्वरूप येत आहे. या लसीकरण मोहिमेत दिव्यांग मात्र पात्र असलेल्या नागरिकांना प्राधान्य द्या, अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ आरोग्य विभागाला केल्या आहेत. महापौर मोहोळ यांच्या सूचनेनंतर आरोग्य विभागाने सर्व लसीकरण केंद्रांना दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्याबाबतच्या लेखी सूचना दिल्या आहेत. याबाबतची मागणी सत्कर्म दिव्यांग फाउंडेशन,एनेब्लर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांनी महापौर मोहोळ यांच्याकडे केली होती.याबाबत महापौर म्हणाले, ‘दिव्यांग व्यक्ती या समाजाचा महत्वाचा घटक आहेत. त्यांना लसीकरण करताना कोणतीही अडचण येऊ नये आणि प्रक्रियेत आणखी सुलभता यावी, याबाबतीतील सर्व सूचना दिल्या आहेत. माझी पुणेकरांना विनंती आहे, दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्रावर आणून त्यांचाही सहभाग या कोरोना लढ्यात नोंदवावा. कारण कोरोना प्रतिबंधक लस घेणे, हेही कोरोना लढ्यातील योगदानच आहे.’