पुणे दि ०१:- नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे कदमवाकवस्ती येथील हवेली दुय्यम निबंधक कार्यालय क्र. ६ व मगरपट्टा येथील हवेली क्र.३ या दोन्ही कार्यालयातील सबरजिस्ट्रार १ जानेवारी २०२१ पासून एक महीन्यांपेक्षा अधिक काळ गैरहजर आहेत. त्यामुळे दस्त नोंदणीचे काम बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याचबरोबर शासनाचा लाखोंचा महसूल अडकला आहे.हडपसर मगरपट्टा येथील हवेली दुय्यम निबंधक क्र.३ व ६ या दोन्ही कार्यालयात एका दिवसात १०० पेक्षाही जास्त दस्त नोंदणी होत असतात. परंतु गेल्या महीन्याभरापासून सबरजिस्ट्रार नसल्याने हजारो दस्त नोंदणी होऊ न शकल्याने शासनाचा लाखों रुपयांचा निधी अडकला आहे.
या दोन्ही कार्यालयात दस्तनोंदणी करण्यासाठी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती,उरुळी कांचन, थेऊर, मांजरी, मुंढवा, शेवाळेवाडी, फुरसुंगी, वडकीगाव, उरुळी देवाचीसह बारा वाड्यांसह हडपसर उपनगरातून नागरिक व वकील दस्तनोंदणीसाठी येतात. सहायक निबंधक रजिस्ट्रार गैरहजर असल्याने दस्तनोंदणीचे काम गेल्या सात दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. तसेच नागरिकांनादेखील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. काही लोकांच्या हट्टापायी नोंदणी अधिकारी हजर होत नसल्याचे कारण असले तरी पूर्व हवेलीत सध्या गुंठेवारीची मागणी जास्त असल्याने दस्त नोंदणी साठी नागरिक व व्यावसायिक यांची पळापळ सुरू आहे. यामुळे सर्वसामान्यां नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन संबंधित ठिकाणी अधिका-यांची नेमणूक करण्याची मागणी पुणे शहरातील नागरिक करत आहे