पुणे दि. 19: उद्योजकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्याचे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आहे. देशाच्या विकासात छोटया उद्योगांचे मोठे महत्व आहे. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना सरळ व सुलभ कर्ज देण्याच्यादृष्टीने प्रधानमंत्री यांनी 59 मिनीटात कर्ज ही योजना नुकतीच जाहीर केली. तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा घेऊन जिल्हयात फार्मा क्लस्टर स्थापन करण्यासंदर्भात केंद्रीय औषधी सचिव नवदीप रिन्वा यांनी फार्मास्युटीकल उत्पादकांना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अन्न व औषध प्रशासनाने सहआयुक्त एस.एन.साक्रीकर, सहायक आयुक्त एस.बी.पाटील यावेळी उपस्थित होते.
फार्मा क्लस्टर स्थापण्यासाठी उद्योजकांना कराव्या लागणाऱ्या विविध उपाययोजना, त्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती इत्यादी विषयांवर यावेळी केंद्रीय औषधी सचिवांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी, फार्मा उत्पादकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.
बैठकीला जिल्हयातील औषधी उत्पादक, सौंदर्य प्रसाधन निर्माते तसेच वैद्यकीय उपकरण निर्मात्या कंपन्यांची प्रतिनिधी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.