पुणे दि. 17: माध्यमांनी तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा. मात्र त्यांनी सामान्य लोकांशी आणि भारतीय संविधनाशी बांधिल राहून काम करावे.माध्यमांनी सत्याची बाजू घेवून त्याचा पाठपुरावा करावा, सत्यनिष्ठा हाच फेकन्यूजला प्रतिबंध करण्याचा उत्तम मार्ग असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे यांनी आज केले.
विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून येथील माहिती केंद्राच्या सभागृहात “डिजीटल युगातील पत्रकारिता:अचारनिती आणि आव्हान” या विषयावर आयोजित चर्चासत्रात श्री. अरुण खोरे बोलत होते. यावेळी उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.
श्री अरूण खोरे म्हणाले, मागणी तसा पुरवठा हा सध्याच्या बाजारपेठेचा नियम आहे. त्यामुळे काही अनावश्यक वाटणाऱ्या गोष्टीही माध्यमातून समोर येत असतात. तंत्रज्ञानाच्या बदलामुळे माध्यमांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. समाजमाध्यमांचा अधिक प्रभाव जनमानसांवर होत आहे. सामाजिक माध्यमांद्वारे सामान्य लोकांच्या मनात गोंधळ आणि संभ्रम पसरविला जातो. समाजमाध्यमावर येणाऱ्या माहितीची कोणतीही खातरजमा न करता तो पुढे पाठविण्याच्या सवयीमुळे यात आणखी वाढ होत आहे. त्यामुळे समाजमाध्यमावर येणाऱ्या प्रत्येक माहितीची खात्री करूनच ती पुढे पाठविली पाहिजे.
माध्यमांची आणि माध्यमकर्मींची सामान्य लोकांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी बांधिलकी असणे आवश्यक आहे. माध्यमकर्मींनी वाचन आणि व्यासंग वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. डिजीटल माध्यमांसाठी नियमावली तयार करण्याची आवश्यकता असल्याचे, श्री. खोरे यांनी सांगितले.माहिती व जनसंपर्क महासंचालनालय शासकीय ध्येयधोरणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन जनसामान्यांपर्यत प्रभावीपणे पोहोचवीत असल्याबद्दल श्री.खोरे यांनी समाधान व्यक्त केले.
श्री. मोहन राठोड म्हणाले, पत्रकारितेच्या क्षेत्रात काही दिवसात मोठा बदल झाला आहे.माहितीचा मोठा खजिनाच सर्वांना खुला झाला आहे.गेल्या काही काळात माध्यमांची संख्या झपाट्याने वाढत असून लोकशाहीच्यादृष्टीने ही अत्यंत चांगली बाब आहे. पत्रकारिता करताना सामाजिक भान ठेवून काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राजेंद्र सरग यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे महत्व विषद केले. सूत्र संचालन वृषाली पाटील यांनी केले. आभार संग्राम इंगळे यांनी मानले.
यावेळी माहिती सहाय्यक जयंत कर्पे, झुंजार न्यूज चॅनेल संपादक :- संतोष राम काळे, पत्रकार विजयकुमार म्हस्के, शिवाजीराव शिंदे, ,अजय पाटील, किशोर भिडे यांच्यासह माहिती कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.