पुणे दि,१४ : -शेतमजूर आणि असंघटित कामगारांचे जीवनमान सुरक्षित करण्याचा आमच्या शासनाने प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
पाटील यांनी एरंडवणे येथील छत्रे सभागृहात कंत्राटी कामगारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधाताई कुलकर्णी, नगरसेवक जयवंत भावे, भाजपचे नेते गणेश कळमकर, कंत्राटी कामगार संघटनेचे सचिन मेंगळे यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री पाटील म्हणाले की, “संपूर्ण राज्यात दोन कोटी शेतमजूर, तर तीन ते साडे तीन कोटी असंघटित कामगार आहेत. असंघटित कामगारांचे जीवनमान सुरक्षित करणे ही आमची नेहमीच प्राथमिकता राहिली आहे. असंघटित कामगारांचे जीवनमान सुखकर होण्यासाठी जॉब सिक्युरीटी सह किमान वेतन मिळणे गरजेचे आहे. यासाठी महायुतीचे सरकारने अनेक योजना राबवलेल्या आहेत. याअंतर्गत शेतमजूर आणि असंघटित कामगारांना पेन्शन योजना सुरु केली आहे. आगामी काळात इतरही प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु”
शहरातील असंघटित कामगारांना देखील भक्ती घरे किमान वेतन आणि इतर सर्व नागरी सुविधा देण्याबाबत आपण पावले उचलली आहेत. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची यापूर्वीच संवाद साधण्यात आला असून त्याचा आराखडा देखील करण्याचे काम प्रगतिपथावर आहे अशी माहिती पाटील यांनी दिली.