पुणे दि१४ :– पांडवनगर येथील चाळी व इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. अशा धोकादायक या वसाहतींचे पुनर्वसन करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (कवाडे गट) उमेदवार दत्ता बहिरट यांनी रविवारी दिली. बहिरट यांच्या प्रचारार्थ पांडवनगर परिसरात पदपात्रा काढण्यात आली. यावेळी बहिरट यांनी मतदारांशी संवाद साधला.महालेनगर, गोविंदराज चौक, मंजाळकर चौक, पीएमसी कॉलनी परिसरात ही पदयात्रा काढण्यात आली. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नीलेश निकम, माजी नगरसेवक उदय महाले, बाळासाहेब चव्हाण, मंगला पवार, अनिता पवार, प्रदीप देशमुख यांच्यासह महाआघाडीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मतदारांशी बोलताना निकम यांनी पांडवनगर येथील पुणे महापालिकेच्या चाळी व इमारतींचा पुनर्वसनाचा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडला आहे. पुणे महापालिकेच्या सभागृहात मंजुरीसाठी याविषयीचा प्रस्ताव आला होता. परंतु बीओटी तत्वावर या इमारतीचे व चाळींचे पुनर्वसन करण्यास अनेकांचे आक्षेप व विरोध आहे. मात्र, नागरिकांना विश्वासात घेऊन काम व्हावे अशी अपेक्षा निकम यांनी व्यक्त केली.याबाबत बहिरट म्हणाले, या चाळी व इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यांचे तातडीने पुनर्वसन करून हा प्रश्न मार्गी लावणे आपले प्राधान्य असणार आहे. गेली अनेक वर्षे या भागातील नागरिक ही मागणी करत असले, तरी सत्ताधाऱ्यांकडून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मतदारांनी संधी दिल्यास हा प्रश्न निकाली लावण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असल्याचे बहिरट यांनी स्पष्ट केले. याशिवाय या परिसरात पाणी, कचरा, सार्वजनिक स्वच्छतागृहे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे बहिरट यांनी स्पष्ट केले.