पुणे : ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक आणि अध्यात्मिक मार्गदर्शक सुधीर पुंगलिया यांनी शिरुर विधानसभा मतदारसंघातून अपेक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला सत्तेची हाव नाही. मात्र, जनतेचे खऱ्या अर्थाने भले करायचे असेल, तर राजकारणाशिवाय पर्याय नाही, ही वस्तुस्थिती असल्यानेच सक्रिय राजकारणात भाग घेण्याचा निर्णय घेतल्याचे पुंगलिया यांनी सांगितले. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबात जन्मलेल्या पुंगलिया हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून त्यांनी कायदा, साहित्य, नगररचना, समाजसेवा, अध्यात्म, पर्यावरण, शिक्षण, अध्यात्म अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. शिरूर, आंबेगाव परिसरात पुंगलिया यांचा जमीन मिळकतीचा व्यवसाय असून जमीन खरेदी- विक्री व्यवहारातील अन्यायग्रस्त व फसवणुकीस बळी पडणाऱ्यांना योग्य कायदेशीर मार्गदर्शन करून त्यांनी अनेकांना मोठ्या नुकसानापासून वाचविले आहे. लाकडी, कौलारू घरांच्या उभारणीसाठी ऐन, सागवान, शिसम अशा दर्जेदार आणि टिकाऊ लाकडांचा पुरवठा करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. पुंगलिया हे लायसन्स्ड सिव्हिल इंजिनिअर असून कमी खर्चात योग्य बांधकाम साहित्याचा वापर करून किफायतशीर आणि दर्जेदार घरबांधणीसाठी ते दीर्घकाळापासून मार्गदर्शन करीत आहेत. नगररचना क्षेत्रात त्यांचा गाढा अभ्यास आहे. विविध शासकीय विभाग आणि ‘पीएमआरडीए’सारख्या यंत्रणांशी संपर्क साधून त्यांनी जनकल्याणाचे अनेक प्रकल्प आणि कायदे सुचविले. मात्र, शासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे त्याची दखल घेतली गेली नाही. ‘गुंठेवारी- नगररचना आणि बेकायदेशीर बांधकामे’ हे पुस्तक प्रसिद्ध करून पुंगलिया यांनी वास्तविक शासकीय यंत्रणांना नगररचनेबाबत संभाव्य धोक्याची जाणीव करून देत ते टाळण्यासाठी उपाययोजनाही सुचविल्या. मात्र प्रशासनाच्या सुस्तपणामुळे त्या अमलात आल्या नाहीत आणि बेकायदेशीर बांधकामांचा प्रश्न आ वासून उभा ठाकला.अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांची उभारणी आणि विकास यामध्ये पुंगलिया यांच्या सहकार्याचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना किफायतशीर दरात दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावे यासाठी रतनबाई रामलाल पुंगलिया यांच्या नावाने अत्याधुनिक साधनसामुग्रीने सुसज्ज असे रुग्णालय उभारले. ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेला त्यांनी तीन गुंठे जमीन बक्षीस दिली. पर्यावरण संरक्षणाचा वसा घेऊन शक्य असेल त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या खर्चाने वृक्षारोपण केले व त्यांच्या संवर्धनाची काळजीही घेतली. अध्यात्मिक क्षेत्रातही पुंगलिया यांचे लक्षणीय योगदान आहे. तरुण वयातच ओशो रजनीश यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले. त्यांच्या क्रातिकारक विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी देशभर पुंगलिया यांनी ओशोंच्या पुस्तके व ध्वनिमुद्रिकांची प्रदर्शने भरविली. शारीरिक सुदृढता आणि मानसिक शांती यासाठी योग आणि ध्यानधारणा आवश्यक असून त्यासाठी पुंगलिया यांनी अनेकांना मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे त्यांना लोकांनी ‘संतपद’ बहाल केले आहे.
लेखक आणि प्रकाशक या नात्याने पुंगलिया यांनी साहित्य क्षेत्राचीही सेवा केली आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले, व पु काळे, कमलाबाई फडके, शिरीष पै, गोपीनाथ तळवलकर अशा विख्यात साहित्यिकांचा सहवास आणि स्नेह त्यांना लाभला. फेसबुकसारख्या अत्याधुनिक समाजमाध्यमांवरही त्यांची चांगली पकड आहे. त्यांच्या मार्गदर्शक आणि प्रेरक लिखाणामुळे त्यांना जगभरात लाखो चाहते लाभले आहेत. ‘अच्छी मानसिकता’ हे सकारात्मक विचारांचा पुरस्कार करणारे साप्ताहिक त्यांनी दीर्घकाळ तब्बल चार भाषांमधून प्रसिद्ध केले. जमिनीच्या व्यवहारात अनेकदा मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे प्रकार घडतात. त्यामुळे कोट्यावधींचे नुकसान होते. कायद्याच्या अज्ञानामुळे होणारी फसवणूक टाळण्यासाठी पुंगलिया यांनी ‘सुधीरनीती’ हे पुस्तक प्रसिद्ध करण्याचा संकल्प केला असून त्याचे लिखाण सुरू आहे.
भारतीय घटना जगातील सर्वाधिक प्रदीर्घ आणि सुस्पष्ट असली तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने सर्वसामान्य जनता अन्यायग्रस्त आहे. अनेक कायद्यांमध्ये कालानुरूप बदल आवश्यक आहेत. अशा सुधारणांसाठी पुंगलिया यांनी राष्ट्रपती कार्यालय व कायदे मंत्रालय यांच्याकडे दीर्घकाळ पाठपुरावा केला. अनेक नवीन कायदे, सुधारणा आणि यंत्रणा सुचविल्या. त्यांनी जनहितासाठी आपली कायदेमंडळात नियुक्ती करावी, यासाठीची विनंती कायदे मंत्रालयाकडे प्रलंबित आहे.
पुंगलिया यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दाखल घेऊन शिरूर आंबेगाव परिसरातील नागरिकांनीच त्यांना राजकारणात सक्रिय होण्याचा आणि त्यासाठी विधानसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह केला आहे. या आग्रहाला मान देऊन ते रिंगणात उतरले आहेत.