मुंबई, दि. ११ :- शिर्डी विमानतळाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता शिर्डी विमानतळाचा विस्तार करून तेथे नवीन टर्मिनल इमारत बांधण्याचे काम सुरू करावे. ही इमारत पूर्ण होईपर्यंत जुन्या टर्मिनलचा विस्तार तातडीने करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे दिले.महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उडान योजना तसेच ‘रिजनल कनेटिव्हीटी स्किम’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विमानांचा आढावा घेण्यात आला. तसेच कंपनीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या अमरावतीतील बेलोरा, पुरंदर, सोलापूर, चंद्रपूर येथील विमानतळांच्या प्रगतीचाही आढावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला.मिहान विशेष आर्थिक क्षेत्रात डिफेन्स हबसाठी जेएसआर डायनॅमिक्स या लष्करी सामग्री निर्मिती करणाऱ्या कंपनीने जागेची मागणी केली होती. या कंपनीसाठी 27 एकर जागा देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मिहानमध्ये आणखी काही कंपन्यांनी युनिट सुरू करण्यास उत्सुकता दाखवली आहे, असे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
अमरावती येथील विमानतळाचे काम सुरू झाले आहे. इतरही विमानतळ, तेथील धावपट्टी यांची कामेही वेगाने सुरू करावीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव राजीव जलोटा, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते.
बाळू राऊत प्रतिनिधी