पुणे,दि.०५:- गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोन दिवसांनी आगमन होत आहे.पुण्यातील गणेशोत्सव देश विदेशात प्रसिद्ध आहे.पुण्यातील गणोशोत्सव देश-विदेशातील भाविक पुण्यात दाखल होत असतात. गणेशोत्सव काळात पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आजपासून ते 18 सप्टेंबर दरम्यान शहराच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात शहरातील मध्य भागात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. नियमंचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही यानिमित्ताने देण्यात आला आहे. वाहनधारकांनी गणेशोत्सव काळात नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
गणेश मंडळांतर्फे शहरातील विविध भागात मोठे देखावे सादर केली जातात. हे देखावे बघण्यासाठी तसेच गणपतीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पुण्याच्या रस्त्यावर येतात. यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता पूर्व तयारी म्हणून वाहतूक शाखेने कंबर कसली आहे. त्यानुसार, शहरातील मध्यभागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 5 ते 18 सप्टेंबर या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
टिळक रस्ता- जेधे चौक ते अलका चित्रपटगृह चौक, कुमठेकर रस्ता – शनिपार ते अलका चित्रपटगृह चौक, शास्त्री रस्ता – सेनादत्त चौकी ते अलका चित्रपटगृह , लक्ष्मी रस्ता- संत कबीर चौक ते अलका चित्रपटगृह चौक, केळकर रस्ता- फुटका बुरूज ते अलका चित्रपटगृह चौक, बाजीराव रस्ता- पूरम चौक ते गाडगीळ पुतळा चौक, छत्रपती शिवाजी रस्ता- गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, सिंहगड रस्ता- राजाराम पूल ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, मुदलीयार रस्ता, गणेश रस्ता, कर्वे रस्ता- नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन रस्ता – खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक, पॉवर हाऊस चौक ते दारूवाला पूल ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौकात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
पुण्यात व्यापारी पेठेत अवजड वाहनांच्या माध्यमातून माल पोहचवला जातो. मात्र, गणेशोत्सवात या अवजड वाहनांमुळे होणारी संभव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे व्यापऱ्यांनी त्यांचा माल आता शहराबाहेर उतरावा अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. त्यानंतर छोट्या वाहनातून माल शहरातील मध्यभागात आणावे, जेणे करुन वाहतूक कोंडी होणार नाही. यासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.