नवी दिल्ली,दि13 :- नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज नवी दिल्ली इथे राजीव गांधी भवनात आयोजित औपचारिक कार्यक्रमात या पदाचा कार्यभार स्वीकारला. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक सचिव वुमुलुन्मंग वुअल्नम यांच्यासह मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यावर मोहोळ म्हणाले,“आपल्यावर ही नवी जबाबदारी सोपवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. गेल्या दशकात या मंत्रालयाने विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून देत विमानतळांच्या संख्येत वेगाने वाढ करत रोजगारनिर्मितीतही वाढ केली आहे.देश लक्षणीय प्रगती करत असून विविध देशांशी जोडला जात आहे.सामान्य जनतेचे विमान प्रवास करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ लागले आहे व त्यांचा आर्थिक स्तरही उंचावत आहे. या प्रगतीबरोबर मंत्रालयावरील जबाबदारीत वाढ झाली असून प्रगतीपथावर राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
मुरलीधर मोहोळ महाराष्ट्रातील पुणे इथून 18 व्या लोकसभेतवर निवडून आले आहेत.यापूर्वी त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदाचा कार्यभार सांभाळला आहे.