पुणे,दि.११ :- झुंजार ऑनलाइन – पुणे शहरातील वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना अडवून ऑनलाइन खटला न टाकता त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या ट्राफिक पोलिसांना पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी इशारा दिला आहे. वाहनचालकाकडून खटल्याचे पावती व्यतिरिक्त पैसे घेताना आढळून आल्यास संबंधित वाहतूक पोलीस अधिकाऱ्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पुणे शहरामध्ये केवळ गुन्हागारांवरच नाही, तर पोलिसांवर देखील अंकुश बसवला जाणार आहे. जर ट्राफिक पोलिसांनी नागरिकांकडून विनाकारण पैसे घेतले, तर आता पोलिसांवरच खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे.
पुणे शहरात वाहतुक कोंडीची गंभीर समस्या बनलेली आहे. वाहतूक कोंडी होत असताना ट्राफिक पोलिसांकडून गाड्या उचललेणे किंवा वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात पोलीस कर्मचारी मग्न असल्याचे दिसून येतात. अनेकदा पोलीस चौकात न थांबता आडबाजूला थांबलेले दिसून येतात. पोलीस कर्मचारी चौकात थांबून वाहन चालकांना अडवून त्यांना कायद्याची भीती दाखवून कारवाईला सुरुवात करतात. घाबरलेल्या वाहन चालकाकडून दंडाच्या पैशाची मागणी करून त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देतात.
या घटनेची गंभीर दखल घेऊन पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
यामुळे चिरीमिरी घेणाऱ्या ट्राफिक पोलिसांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
हे पोलीस कर्मचारी साध्या वेशात वाहन चालक म्हणून शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरणार आहेत.
वाहतूक पोलीस नागरिकांवर कारवाई करताना चिरीमिरी घेतात का? त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात का? याची
या पथकाकडून पाहणी केली जणार आहे. गैरप्रकार आढळून आल्यानंतर तात्काळ संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर
खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.