पुणे,दि.२५:- पुण्यातील पब, हॉटेल्स, बार आणि रूफ टॉप हॉटेल्स मध्यरात्रीनंतर दीड वाजता बंद करण्याची वेळेचे बंधन आहे.
परंतु ही वेळ पब चालकांकडून पाळली जात नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पब, हॉटेल्स, बार आणि रूफ टॉप हॉटेल्सवर लाईव्ह वेब कास्टिंगद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना विविध उपाययोजनेअंतर्गत राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाला सूचना केली आहे. त्यावर गांभीर्याने विचार करून हा निर्णय अमलात आणला जाणार आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व पब, परमिट रूम, बारची तपासणी करण्याच्या सूचना विविध सामाजिक कार्यकर्ते, नागरी समाज आणि संघटनांनी केल्या होत्या. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पुणे शहरातील सर्व पब्ससह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परवानाधारक हॉटेल, पबमध्ये अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येऊ नये. मध्यरात्री १.३० नंतर कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येऊ नये. महिला वेटर्समार्फत रात्री ९.३० नंतर कोणतीही विदेशी दारू सर्व्ह करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
विविध उपाययोजनांमध्ये सर्व पब, रूफ टॉफ हॉटेल्सकडून वेळेचे बंधन पाळले जाते की नाही, यावर नजर ठेवण्यासाठी वेब लाईव्ह कास्टिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क, पुणे महापालिका, पुणे व ग्रामीण पोलीस प्रशासन, पीएमआरडीए प्रशासन यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा सुरू आहे. पब, रूफ टॉप, लाउंज बार हॉटेल असोसिएशननेदेखील स्वयंनियमन करण्याचे आदेश दिले आहेत.”
महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या परवानग्या, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून यापूर्वी झालेल्या दंडात्मक कारवायांचा आढावा घेतला जात आहे. सर्व नियम आणि अटी पाळल्या आहेत का, याची खातरजमा केली जाईल. दंडात्मक कारवाई झाल्यानंतरदेखील जर नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले तर परवाना निलंबित तसेच कायम रद्दची कारवाई केली जाईल,” असेही जिल्हाधिकारी डाॅ. दिवसे यांनी सांगितले.