मुंबई,दि.२१ :- राज्यात आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. तसा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिलाय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या विभाग आणि सेलच्या कार्यकारिणी बरखास्त केल्या आहेत. सगळ्या सेलच्या प्रमुखांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांनी पत्र दिलं आहे. त्यात कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. निवडणुकीच्या तोंडावर जुन्या पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल पटेल यांच्या सहीचं एक पत्र चांगलंच व्हायरल होत आहे. त्यात पक्षाचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच हा निर्णय घेतल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या असलेल्या अनेक सेल आणि विभागावर आता नव्या नियुक्त्या केल्या जातील हे निश्चित मानलं जात आहे.
शरद पवारांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत
सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या अहवालातील शिफारशी स्वीकारून ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास आज मान्यता दिली. न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी सुरू असलेली न्यायालयीन लढाई महाराष्ट्राने आज जिंकली याचे समाधान वाटते.
ओबीसी समाजासोबत आम्ही नेहमीच असू
हे आरक्षण टिकावे यासाठी छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वाने प्रामाणिक प्रयत्न केले आणि आज त्याची परिणती या निर्णयात दिसली. मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करत राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. ओबीसी समाजासोबत आम्ही नेहमीच असून त्यांच्या उन्नतीप्रतिची बांधिलकी कायमच राहील, याचा पुनरुच्चार या निमित्ताने करतो.