सावकारकीच्या २२ प्रकरणांचा निपटारा तर १ कोटी ८७ लक्ष रुपयांच्या अंतर्भूत मालमत्तेचे संरक्षण
जमिनी,वाहनांची सोडवणूक करत तोडले ‘सावकारकीचे बंध’
कर्जत दि.११ :- ‘तो कधी कुणाला आपला भाऊ वाटला, कुणाला आधार देणारा बाप तर कधी कुणाला जीव वाचवणारा देवदूत वाटला..! गोर-गरिबीच्या अन् सावकरकीच्या खाईतून वाचवून अनेक पीडितांचे अश्रु पुसले. अनेक आया-बहिणी आणि सावकारकीत पिसलेल्या शेतकाऱ्यांचे हुंदके त्याच्या विश्वासाच्या वर्दीवर खांदा टेकून शमले. त्याचे आभार मानताना धाय मोकलून रडणारी पीडित कुटुंबे तालुक्याने पाहिली.हो..! ही किमया आहे कर्जतचे उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यांची.
वर्षपुर्तीच्या कालावधीत तालुक्यातील जुलमी खाजगी सावकारकीचे कंबरडे मोडून नागरिकांची पिळवणूक थांबवली. सावकारकी हा अनेकांचा पिंड बनला होता.अनेक मातब्बर मंडळी खाजगी सावकारकीच्या धंद्यात आपला पाय रोवून होती.टक्केवारीच्या मनमानी आकड्यात अन् चक्रीवाढ व्याजात अनेकांच्या जमिनी व आयुष्यभराची कमाई गेली.सावकारांकडून पैशांसाठी होत असलेला कौटुंबिक अत्याचार, मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान यात अनेक कुटुंबांची वाताहत झाली.कर्जत तालुका अशा ‘व्हाईट कॉलर’ लुटारुंचे जणु माहेरघरच बनला होता.
कर्जतच्या पोलीस ठाण्याचा पदभार उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्विकारला आणि त्यांनी सावकारकीची पाळेमुळे नाहीशी केली.कर्जतची परिस्थिती लक्षात घेत आपल्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेत काम सुरू केले.कल्पकता आणि सुनियोजित आखणी यामुळे ‘सिंघम’ अधिकारी म्हणुन त्यांची राज्यभर ओळख निर्माण झाली. सावकारकीच्या फासात गुंतलेली अनेक कुटुंबे आज ताठ मानेने जगू लागली आहेत.वर्षपूर्तीत यादव यांनी केलेली ही कामगिरी प्रत्येकाच्या मनात पोलिसांप्रती विश्वास संपादन करणारी ठरली आहे.सावकार व सावकारकीच्या विरुद्ध नागरिकांना आवाहन करून अभय दिले ‘पुढे या, मी तुमच्या पाठीशी आहे तुमचे कुणीच काहीही वाकडे करणार नाही’ असा विश्वास दिला.सोशलमिडियावर प्रभावी जनजागृती केली.आणि वर्षभरात सावकारकीच्या तब्बल २२ तक्रारी पोलीस ठाण्यात आल्या.यातील १० प्रकरणात परस्पर तडजोड होऊन केवळ मुद्दल घेण्याच्या अटीवर तडजोडी झाल्या.तर १२ प्रकरणात सावकारांवर गुन्हे दाखल केले. एका वर्षाच्या कालावधीत २२ प्रकरणे प्रत्यक्षात तर शेकडो प्रकरणे परस्पर मार्गी लागली आहेत.कोणाची वाहने तर कोणाची जमीन अशी एकुण १ कोटी ८७ लक्ष १ हजार रुपयांची मालमत्ता अंतर्भूत आहे की जी सावकारांच्या ताब्यात गेली असती. सावकारकी धंद्यात अनेक बड्या खाजगी सावकारांना जेलची हवा दाखवणारे पोलिस निरीक्षक यादव हे कर्जतचे पहिले पोलीस अधिकारी ठरले. सावकाराने व्याजात लुबाडलेल्या जमिनी कित्त्येक वर्षे उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना परत मिळवून दिल्या आहेत. व्याजाच्या रकमेत ओढून नेलेली नवी कोरी वाहने पुन्हा नागरिकांना त्यांच्या ताब्यात दिली आहेत. नागरिकांना प्रचंड मानसिक शारीरिक त्रास होत होता त्यामधून मुक्तता झाली, ज्यांनी सावकारांच्या भीतीने गावे सोडली होती ते नागरिक गावात परत आले, काही आत्महत्या होता होता वाचल्या. वर्षपूर्तीच्या कालावधीत यादव यांनी केलेल्या या कामाचा लेखाजोखा सर्वसामान्यांसाठी खऱ्या अर्थाने न्याय प्रदान करणारा ठरला आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून सन्मान!
कर्जत पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाया आणि लावलेल्या अवघड तपासांमुळे पोलीस अधीक्षक सौरभ पाटील यांच्या वतीने कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या तपासी टीमला अनेकवेळा गौरविण्यात आले.अनेक गुन्ह्यांची कमी कालावधीत उकल लावण्याची किमया कर्जत पोलिसांनी केली असुन ही गौरवशाली बाब आहे.
अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘यादव पॅटर्न’
कर्जतच्या पोलीस ठाण्यात रुजू झाल्यानंतर चंद्रशेखर यादव यांनी धाडसी कारवायांचे सत्र सुरू करून तालुक्याला वेगळी शिस्त लावली. खोट्या गुन्ह्यांना चाप देत,खाजगी सावकारी,वाहतूक नियंत्रण,महिला सबलीकरण,भरोसा सेल,ग्रामसुरक्षा यंत्रणा असे प्रभावी उपक्रम राबवून पोलीस विभागाला उंचीवर नेले. त्यांनी राबवलेला ‘यादव पॅटर्न’ अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वापरण्यात येत आहे हे विशेष.
‘त्या’ जमीनवादाच्या प्रकरणाची सर्वत्र चर्चा!
कुळधरण येथील अतुल सुपेकर या शेतकऱ्याने जमिनीच्या वादात न्याय मिळत नसल्याने सोशल मीडियावर ‘मी आत्महत्या करत असुन माझा मृतदेह तुम्हाला कुठेतरी लटकलेला दिसेल’ अशी खळबळजनक पोस्ट करून मोबाईल बंद केला होता.त्याच्या जिवितासाठी अनेकांनी शोधमोहीम सुरू केली होती मात्र यादव यांनी हे प्रकरण अतिशय कल्पकतेने हाताळून ‘त्या’ शेतकऱ्यास न्याय मिळवून दिला होता.