श्रीगोंदा,दि २३ :- श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फाटा येथे एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले.किरण अरुण दरेकर वय ३३ , रा . करंदी , ता . शिरुर , जिल्हा पुणे असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या गावठी कट्टे बाळगणारे व विक्री करणा – या गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्याचे आदेशानुसार जिल्ह्यात गावठी कट्टे बाळगणारे व विक्री करणा-या गुन्हेगारांची माहिती घेत असतांना दिनांक १७ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना खबऱ्याकडून बेलवंडी ते श्रीगोंदा रोडवर, बेलवंडी फाट्याजवळील साई गार्डन हॉटेलसमोर बेकायदेशिररित्या गावठी कट्टा कब्जात बाळगून विक्री करण्याचे करण्याचे उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. पो.नि अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले. माहितीच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा लावून संशयीत नजरेने टेहळणी करीत असलेल्या इसमाला घेराव घालून ताब्यात घेतले. अधिक विचारपूस करत तपासणी केली असता त्याने किरण अरुण दरेकर वय ३३ , रा . करंदी , ता . शिरुर , येथील असल्याचे सांगीतले. त्यांचे अंगझडतीमध्ये एक गावठी कट्टा व चार जिंवत काडतुस असा एकूण २५ हजार ८०० रु . किं . चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात येऊन त्याला ताब्यात घेऊन बेलवंडी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, पुढील कार्यवाही बेलवंडी पो.स्टे . करीत आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील स.फौ.भाऊसाहेब काळे,पो.हे.कॉ. विजय वेठेकर ,भाऊसाहेब कुरुंद , पो.ना. ज्ञानेश्वर शिंदे , शंकर चौधरी, देवेंद्र शेलार यांनी केली.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे