मुंबई, दि.११:- लोकसत्तेचे पत्रकार संदीप आचार्य व पत्रकार निशांत सरवणकर यांनी मुंबई बॅंकेच्या विरोधात कथित लेख व बातम्या लोकसत्ता वृत्तपत्रात वेळोवेळी प्रसिध्द करुन मुंबई बँकेची व आपली विनाकारण बदनामी केल्याबद्दल मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी काल दोन्ही पत्रकारांविरुध्द माता रमाबाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रात्री उशिरा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदा होडगे यांनी दरेकर यांच्या जबाबाचे अवलोकन केले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या ललिता कुमारी विरुध्द भारत सरकार यांच्या खटल्यातील दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार प्राथमिक चौकशी केली जाईल. तसेच प्राथमिक चौकशीच्या निष्कर्षांनंतर त्वरित त्यापुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
लोकसत्ता दैनिकात “प्रविण दरेकर … मुंबई बँकेचे श्रीमंत मजूर” या मथळ्याखाली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरोधातील बातमी आज प्रसिद्ध झाली. या बातमीमुळे मुंबई बँक आणि विरोधी पक्ष नेत्यांची बदनामी झाली. त्यामुळे याप्रकरणाची दखल घेऊन विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात आपला जबाब नोंदविला. पत्रकार संदिप आचार्य व निशांत सरवणकर यांनी वेळोवेळी लोकसत्तामध्ये विविध लेख व बातम्या प्रसिध्द करुन आपली व मुंबई जिल्हा बँकेची नाहक बदनामी केली आहे. लोकसत्ता विरोधात यापूर्वी दाखल करण्यात आलेला १ हजार कोटीचा दावा मागे घ्या अन्यथा आम्ही तुमच्या विरोधात बातम्या लिहित राहू अशा आशयाची बदनामी करण्याची धमकी आचार्य यांनी दिल्याचे दरेकर यांनी आपल्या जबाबात नोंदविले आहे.
परंतु जबाब नोंदविल्यानंतर मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुध्द तक्रार दखल करून घेण्यास नकार दिला. याचा निषेध म्हणून प्रविण दरेकर यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या देऊन उपोषणास सुरुवात केली. महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली पोलीस प्रशासन काम करीत असून ही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही अशी भूमिका यावेळी घेण्यात आली. प्रसारमध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, पत्रकार आचार्य आणि सरवणकर यांनी गेली १२ वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून छळ मांडला आहे. मुंबई बँकेने लोकसत्ता विरुध्द जो अब्रूनुकसानीचा दावा टाकलेला आहे तो मागे घेण्यासाठी संदीप आचार्य धमकी देत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात रीतसर गुन्हा दाखल करा, चौकशीअंती पोलिसांना काही नाही सापडले तर ठीक आहे. परंतु ललित कुमार या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार एफआयआर दाखल केला पाहिजे अशी मागणी करीत विरोधी पक्ष नेते यांनी सुमारे चार तास माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यासमोर उपोषण सुरु केले. यावेळी भाजपा मुंबईचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा ,आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह सहकारातील अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत.