दि.०८ : -श्रीगोंदे तालुक्यातील अजनूज व पेडगाव शिवारात सुरु असणारी वाळूचोरी बंद करण्यासाठी तहसीलदार मिलींद कुलथे हे शनिवारी रात्री आठ वाजता नदीपात्रात गेले.त्यावेळी तेथे वाळू भरण्यासाठी आलेल्या पाच ट्रक त्यांनी पकडल्या.
व येथील भीमानदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचोरी होत असल्याने ती बंद करण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यात तेथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषण केले होते. ही चोरी बंद करण्यासाठी तहसीलदार कुलथे यांनी प्लॅन आखला व त्यानूसार शनिवारी रात्री ते चालकासोबत नदीपात्रात घुसले. त्यांना तेथे वाळू भरण्यासाठी आलेले पाच ट्रक आढळले. तहसीलदार कुलथे यांना पाहताच काही वाळू तस्करांनी धुम ठोकली. वहाने मिळाल्याने कुलथे यांनी गावातील प्रमुखांना फोन करुन मदतीला येण्याचे आवाहन केले.
मात्र त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कुलथेंनी पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना फोन करीत पोलिस बंदोबस्त मागवित वहाने नदीपात्रातून काढण्यास सुरुवात केली. पहाटे तीन वाजेपर्यंत वहाने काढली जात होती.
चौकट:-‘नव्या वाळू धोरणानूसार चोरी पकडण्यात ग्रामपंचायत सदस्यांना प्रशासनाला मदत करावी लागणार आहे. त्यानूसार आपण कायदेशिर मदत मागितली. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. पेडगावच्या पोलिस पाटील यांना अनेकवेळा फोन करुनही ते आले नाहीत.त्यांचा निलंबन प्रस्ताव देणार आहे. पकडलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.’
- मिलींद कुलथे, तहसीलदार
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे