पुणे दि.३१:-पुणे जिल्हा (ग्रामीण) मध्ये शिवभोजन योजना १ एप्रिल २०२० पासून सुरू झाली आहे. कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घातल्याने १५ एप्रिल २०२१ पासून पुणे जिल्ह्यामध्ये मोफत शिवभोजन थाळ्यांचे वितरण शासनाच्या आदेशान्वये होत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी कळविले आहे.पुणे जिल्हा (ग्रामीण) मध्ये शिवभोजन केंद्रांची संख्या आंबेगाव- ४, जुन्नर- ८, खेड- ६, मावळ- ६, मुळशी -७, शिरुर- ५, भोर- ३, पुरंदर- ४, वेल्हे- १, दौंड- ५, बारामती -१५, इंदापूर- ५, हवेली- ९ अशी एकूण- ७८ शिवभोजन केंद्र मंजूर असून आज रोजी ६७ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. पुणे जिल्हा (ग्रामीण) साठी दैनंदिन ७ हजार १५० इतक्या थाळ्यांचे उदिष्ट मंजूर असून कोरोना काळात १५ एप्रिल २०२१ पासून दिड पट दैनंदिन १० हजार ७२५ इतका इष्टांक मंजूर झालेला असून दररोज सरासरी ९ हजार ८६५ इतक्या थाळ्यांचे वितरण होत आहे. १५ एप्रिल २०२१ ते आजअखेर सरासरी १३ लाख १३ हजार ८८२ एवढ्या शिवभोजन थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आलेले आहे. योजनेचा लाभ रोजंदारीने कामावर जाणारे, गोरगरिब लोकांना भेडसवणारी जेवणाची समस्या सोडवण्यासाठी शासनाने एक शिवभोजन थाळी सुरू केलेली आहे. सुरवातीला शिवभोजन थाळी ही ५ रु. दराने उपलब्ध होत होती. १५ एप्रिल २०२१ पासून हीच थाळी शासनाने विनामूल्य तसेच शक्य तिथे पार्सल सुविधेद्वारे उपलब्ध करून दिलेली आहे. गोरगरिबांसाठी स्वस्त दरात स्वच्छ, पोषक आणि ताजे जेवण देणारी ही योजना असून त्याचा लाभ गरिब आणि गरजू जनतेला होत आहे. शिवभोजन थाळीचे वितरण होताना लाभार्थ्यांचे नाव व फोटो शिवभोजन अँप मध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारे अपलोड करूनच थाळीचे वितरण करण्यात येत आहे, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.