पुणे, दि.२४: – केंद्रीयमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणेंनी खळबळजनक आणि वादग्रस्त विधान केले.या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या विधानावर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून, नाराय राणे यांच्या तक्रार दाखल करण्यात आली आहे.असा आहे नारायण राणे यांच्या विरोधातील तक्रार अर्ज – मी रोहीत रमेश कदम, (वय २९ वर्ष, धंदा युवासेना चिटणीस, रा. फ्लॅट नं. ४, नाईकनवरे बिल्डींग, विठ्ठल मंदीर शेजारी, सुतारवाडी, पाषाण, पुणे) मी वरील ठिकाणी माझे कुटुंबासह राहत असुन मी युवा सेना, कोथरुड मतदार संघ, पुणे येथे चिटणीस पदावर गेल्या सहा महीन्यापासुन काम करतो.दि. २३/०८/२०२१ रोजी रात्री १०/३० वा. चे सुमारास मी माझे घरातील टी व्ही वर न्युज पाहत असताना एका व्हीडीओ मध्ये नारायण राणे, केंद्रीय मंत्री सुक्ष्म लघु उदयोग, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचेबाबत त्यांच अॅडव्हाइज कोण त्यांनाच काही कळत नाही, ते काय आम्हाला अॅडव्हाइज करणार ? ते काय डॉक्टर आहेत का ? तिस-या लाटेचा कोठुन आवाज आला त्यांना ? त्यांना आणि ती पण लहान मुलांना ? अपशकुनासारख बोलु नको म्हणाव.त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का ? बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणाव. त्यादिवशी नाय का ? किती वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळुन ? अरे हीरक महोत्सव काय ? मी असतो तर कानाखाली चढवली असती’ असे म्हणुन त्यांनी मुख्यमंत्री महोदयाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करुन दोन गटामध्ये तेढ निर्माण होवुन दंगा होणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याच्या गैरहेतुने चिथावणी देणारे वक्तव्य केलेले आहे.
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे बाबत अपशब्द वापरल्याने त्यांचे चाहते, समुह व त्यांचे पक्षातील गट हा आक्रमक होवुन त्यातुन काहीतरी अनुचित प्रकार घडावा जेणेकरुन महाराष्ट्रातील परीस्थिती अस्थिर करुन त्याचा गैरफायदा घेणेचे गैरहेतुने जाणिवपुर्वक परिणामांची कल्पना असताना सदर वक्तव्य करण्यासाठी नारायण राणे यांनी जाणिवपुर्वक व हेतुपुरस्कर पत्रकार परिषद घेतली आहे.तसेच सदर वक्तव्यामुळे माझे सारखे शिवसैनिकाच्या व सामान्य नागरिकांच्या भावना दुखविल्या गेल्या असुन त्यामुळे विविध गटांमध्ये द्वेष व शुत्रुत्वाची भावना निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. अशा त्यांच्या वक्तव्यामुळे जनमानसामध्ये भितीदायक वातावरण निर्माण झालेले असुन त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होवुन त्यातुन मोठा वाद होवुन दंगा घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणुन माझी नारायण राणे, केंद्रीय मंत्री सुक्ष्म लघु उदयोग, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेविरुदध कायदेशिर तक्रार आहे.