पिंपरी चिंचवड, दि.२३ :- अंगात निळया रंगाचा शर्ट , खाकी पॅन्ट व पायात काळा बुट घालून पोलीस असल्याचे सांगून एका व्यक्तीला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) हॉस्पिटल येथे आणले. आरोपीचे स्टेटमेंट साहेबांना पाठवायचे असल्याचे सांगून मोबाईल घेऊन व्यक्तीची फसवणूक केली.याप्रकरणी तोतया पोलिसाला वाकड पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. हा प्रकार 26 मार्च रोजी काळेवाडी आणि वायसीएम हॉस्पिटल येथे घडला.सचिन भाऊसाहेब सकाटे (वय 37, रा. तानाजीनगर, चिंचवडगाव) असे अटक केलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी इरफान हाशम शेख (वय 44, रा. चाकण) यांनी रविवारी (दि. 22) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पोलिसांप्रमाणे वेष परिधान करून स्वतः पोलीस असल्याचे भासवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून आरोपी तोतया पोलिसाने फिर्यादी यांना वायसीएम हॉस्पिटल येथे नेले. तिथे गेल्यानंतर आरोपीच्या स्टेटमेंटचा फोटो अर्जंट साहेबांना पाठवायचा असल्याची बतावणी करून आरोपीने फिर्यादी यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन घेतला. आरोपीने घेतलेला फोन फिर्यादी यांना परत न देता फसवणूक केली. पोलिसांनी तोतया पोलिसाला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास सपोनि पाटील , करीत आहेत.