पुणे, दि.२० :- शिवसेनेच्या गेल्या पाच दशकांतील राजकीय स्थित्यंतराचा मागोवा घेणाऱ्या ‘शिवसेना: अस्मिता, संघर्ष, वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झाले. शिवसेनेचा भूतकाळ आणि वर्तमानातील मुख्यमंत्री पदाचे शिवसेनेचे साकार झालेले स्वप्न या सर्व घडामोडींचा समावेश असलेल्या या पुस्तकाचे कौतुक खा. राऊत यांनी यावेळी केले. सामनाच्या मुंबई कार्यालयामध्ये हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक, मुक्त पत्रकार मेघा शिंपी उपस्थित होत्या.
राज्यातील सर्व शासकीय ग्रंथालयांमध्ये हे पुस्तक ठेवावे. सामान्यांना परवडेल अशा किमतीत आवृत्ती काढून ते अनेक वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचवावे अशा शुभेच्छाही खा. राऊत यांनी यावेळी दिल्या.
मराठीमध्ये असलेले या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती लवकरच बाजारात आणण्याचा आमचा मानस असल्याची भावना डॉ. रघुनाथ कुचिक यांनी व्यक्त केली. पुस्तकाची निर्मिती डॉ. कुचिक यांच्या प्रबोधन ट्रस्टतर्फे केली गेली असून सौर पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ राजकीय अभ्यासक प्रकाश अकोलकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील अनेक जाणकार आणि अभ्यासकांनी शिवसेनेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेविषयी जाणू पाहणाऱ्या नवीन पिढीला आणि एकंदरीत महाराष्ट्रातील मराठी वाचकांना हे पुस्तक वाचताना नक्कीच आनंद मिळणार आहे असे मत पुस्तकाच्या कार्यकारी संपादिका मेघा शिंपी यांनी व्यक्त केले. फोटो ओळ : ‘शिवसेना: अस्मिता, संघर्ष, वाटचाल’ पुस्तकाचे प्रकाशन खा. संजय राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक आणि लेखिका मेघा शिंपी उपस्थित होत्या.