कर्जत दि २२ :-अनधिकृतपणे खाजगी सावकारी करून वसुलीसाठी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खाजगी सावकार महेंद्र उर्फ गणेश नाना नेटके आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत.खासगी अवैध सावकारी करणाऱ्यांनी कर्जत तालुक्यात बस्तान बसवून गरजू लोकांना शोधून त्यांना अव्वाच्या – सव्वा व्याज दराने कर्ज वाटप केले जात आहे. यात सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जासाठी तारण म्हणून खासगी सावकार कर्जदात्यांकडून त्याचे घर, शेती, प्लॉट आपल्या नावावर करून घेतात. अशा सावकारांची त्या परिसरात दहशत असल्याने त्यांच्याविरुद्ध कोणीही बोलत नाही. यामुळे अशा सावकारांचे धाडस वाढते.सविस्तर वृत्त असे की, दि.१७ जून रोजी सकाळच्या सुमारास आरोपी महेंद्र उर्फ गणेश नाना नेटके व दोन साथीदार हे सर्व रा.नेटकेवाडी ता.कर्जत जि.अहमदनगर यांनी फिर्यादी व त्याचा भाऊ वैभव अंकुश दळवी यांचे घरात येवून फिर्यादीचे नातेवाईक यांना घरात घुसुन व्याजाने घेतलेले ५ लाख ५०हजार रुपये व त्यावरील व्याजासह १०लाख रु द्या असे म्हणून लाथाबुक्याने मारहाण करून दळवी यांचा फार्मट्रॅक कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर त्याचा क्र.एम.एच.१६ एफ ६७६६ हा बळजबरीने चोरुन नेतांना म्हणाले की, आमचे १० लाख रु.द्या तेव्हा तुमचा ट्रॅक्टर घेवून जा. जर तुम्हाला पैसे द्यायचे नसले तर तुमची जमीन माझे नावावर करुन द्या नाहीतर तुमच्या घरातील एकालाही जिवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली आहे.यावरून कर्जत पो.स्टे.गु.र.नं. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी महेंद्र उर्फ गणेश नाना नेटके रा.नेटकेवाडी ता.कर्जत जि. अहमदनगर यास अटक केले असून त्याचे कडुन फार्मट्रॅक कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर क्र.एम.एच. १६ एफ ६७६६ हा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार सलिम शेख, उद्धव दिंडे,अमित बर्डे, मनोज लातूरकर यांनी केली आहे.कर्जत तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही अवैध सावकारकी करु नये. कोणत्याही ग्रामस्थांना सावकाराकडुन वसुली साठी काही त्रास जसे वारंवार फोन करणे, घरी येणे, शिवीगाळ करणे, वस्तु उचलून नेणे अगर इतर कोणताही प्रकार होत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करावा. कोणताही तक्रारदार हा पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आल्यास त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास सावकाराकडुन होणार नाही, याची पोलीस काळजी घेतील.चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे