पिंपरी चिंचवड दि १३: – पिंपरी चिंचवड महापालिकेचे अॅटोक्लस्टर कोविड सेंटरमधील डॉक्टरांकडून बेडसाठी १ लाख रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे हे कोविड सेंटर चालविणार्या स्पर्श हेल्थ केअरच्या कारभाराविषयी सर्व बाजूने टिका होत असतानाच त्यांच्याविरोधात एका दैनिकाच्या पत्रकाराने बातम्या देण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पत्रकाराने फेबुवारी 2021 मध्ये तब्बल ५ लाख रुपयांची खंडणी घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्पर्श हेल्थ केअर संस्थंचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल अशोक होळकुंदे (वय ३८, रा. सोमाटणे फाटा, ता़ मावळ) यांनी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यावरुन पोलिसांनी सुहास संभाजी भाकरे (वय ४३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भाकरे हे पुण्यातील एका दैनिकाचे पिंपरी-चिंचवड येथील काम पाहतात. त्या दैनिकासाठी ते पिंपरी-चिंचवडमध्येच पत्रकारिता करतात. स्पर्श संस्था सप्टेंबर २०२० पासून अॅटोक्लस्टर येथील डेडिकेटेड कोविड सेंटर चालवत आहे. संस्था योग्य प्रकारे काम करीत असताना सुहास भाकरे याने संस्थेच्या डॉक्टर व संचालकांशी संपर्क सांधून माझी आर्थिक मागणी पूर्ण करा नाही तर मी तुमच्या संस्थेच्या विरोधात रान उठवेन व तुमच्या संस्थेच्या विरोधात बातम्या देऊन तुमच्या संस्थेचे कन्ट्रक्ट बंद करण्यास भाग पाडेन, असे धमकाविले. तसेच २७ नोव्हेंबर २०२० रोजी सुहास भाकरे याने संस्थेचे संचालक विनोद आडसकर हे अॅटोक्लस्टर येथे असताना त्यांच्या मोबाईलवर व्हॉटसअप करुन मी कोविड केअर सेंटरबाबत तक्रारी करीत आहे. मी तुमचे बिल अडकवून ठेवीन. माझ्या मागणीचा विचार करा. वकिलाच्या नावे असलेल्या नोटीसीचा ड्रफ्ट व्हाटसअपद्वारे एक प्रकारचा धमकीवजा मेसेज पाठविला. तसेच तशा प्रकारचा दुसरा मेसेज ८ डिसेंबर २०२० रोजीही पाठविला. २३ फेबुवारी २०२१ रोजी डॉ. अमोल होलकुंडे हे महापालिकेमध्ये गेले असताना पत्रकार सुहास भाकरे याने त्यांना महापालिकेबाहेर ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. पत्रकारास विरोध करायला नको, या भितीपोटी त्यांच्या संस्थेने भाकरे याला ५ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यापैकी २ लाख रुपये त्याला रोख स्वरुपात पिंपरी चिंचवड महानगरपोलिकेच्या बाहेर दिले. तसेच ३ लाख रुपये संस्थेच्या खात्यावरुन त्याच्या भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या खात्यावर Niftyद्वारे पाठविले. स्पर्श संस्थेविषयी अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्यावर व पोलिसांनी येथील डॉक्टरांवर गुन्हा दाखल केल्यानंतर आता आपल्याकडून खंडणी उकळल्याची फिर्याृद डॉ. अमोल होळकुंदे यांनी पिंपरी पोलिसांकडे केली आहे.पत्रकारावर 5 लाख रूपयांच्या खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, फेब्रुवारी 2021 मध्ये खंडणी दिल्यानंतर एवढ्या उशिरा का तक्रार दाखल करण्यात आली याबाबत देखील चर्चा सुरू आहे. मात्र, पत्रकाराविरूध्द 5 लाख रूपयांच्या खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोउनि वाघमारे करत आहे