पुणे दि ०५ : पुणे शहरात बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ मध्यरात्री तडीपार गुंडाने पोलिस हवालदारावर चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे व, काही तासाचाने वेश्यावस्तीतील एका महिलेचा देखील चाकूने वार करून खून करण्यात आला. मध्यवस्तीत झालेल्या दुहेरी मर्डरमुळे पुणे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिस हवालदार समीर सय्यद (वय ४८, रा. खडक पोलीस लाईन ,शुक्रवार पेठ) असे खून झालेल्या पोलिसाचे नाव आहे. तर राणी शेख (वय ३०, रा. बुधवारपेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
हवालदार सय्यद यांच्या खून प्रकरणी फरासखाना पोलिसांनी तडीपार गुंड प्रवीण महाजन (वय ३४, रा. कसबा पेठ) याला अटक केली आहे.ही घटना बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडली. राणी शेख यांना चाकूने भोसकल्यानंतर आरोपीने पळ काढला असून, ही घटना पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास घडली आहे.महाजन हा पुणे शहर पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर २० पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे पोलिसांनी आतापर्यंत त्याला पुणे शहरातून दोनदा तडीपार केले आहे.पोलिस हवालदार सय्यद हे सध्या पुणे शहर फरासखाना पोलिस ठाण्यात नियुक्तीवर होते. काल रात्री ते ड्युटीवरुन घरी जात होते. त्यावेळी श्रीकृष्ण टॉकीजजवळ त्यांना प्रवीण महाजन दिसला. त्यावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी प्रवीण याने त्याच्याकडील चाकुने सय्यद यांच्यावर वार केले. त्यातील एक वार गळ्यावर लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरु झाला. हे पाहून तेथे असलेल्या लोकांनी प्रवीण याला पकडले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सय्यद यांना केईएम हॉस्पिटलमध्ये नेले. गळ्यावर वार झाला असल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाल्याचेदेखील समजते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रवीण महाजन याला अटक केली आहे. मात्र राणी शेख हीच खून कोणी आणि कशासाठी केला हे मात्र अद्याप समजू शेकलेले नाही. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे करीत आहे