श्रीगोंदा दि ०३ : – नागरिकांना पुरेशी व्यवस्था करण्यासाठी मध्ये एक दिवसाचा वेळ देत श्रीगोंदा तालुक्यात बुधवारी (५) पासून कडक जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय आज प्रशासनाने घेतला आहे. तालुक्यातील रुग्णसंख्या १५० च्या वर गेल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ५मे ते १४ मे असा हा १० दिवसांचा जनता कर्फ्यु असेल, असे तहसीलदार श्रीगोंदा तथा इनसिडेंट कमांडर श्रीगोंदा प्रदीप कुमार पवार यांनी जाहीर केले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन प्रशासनाने बुधवारपासून जनता कर्फ्यु लागू करण्याचे ठरवले आहे. परंतु जनता कर्फ्यू अचानक लागू न करता नागरिकांना एक दिवसाचा वेळ देऊन बुधवारपासून जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ५ ते १४ मे या कालावधीत फक्त मेडिकल व आरोग्य सेवा या नियमावलीचे पालन करून सुरू राहतील. दूध डेअरी व दुध विक्रेते,पिण्याचे पाणी यांना सकाळी ९ पर्यंत संकलन व घरपोच वितरणाकरिता मुभा देण्यात आली आहे.पेट्रोल व डिझेल पंप हे फक्त अत्यावश्यक सेवासाठीच सुरू राहतील. अत्यावश्यक कारण व काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने करण्यात आले आहे.धास्तावलेल्या नागरिकांनी आज बाजारपेठेत सकाळी ७ ते ११ या वेळेत प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. प्रशासनाने उद्याचा (४) एक दिवस दिला आहे. दरम्यान नागरिकांनी गोंधळून न जाता शिस्तीचे पालन करून नियोजन करावे असे आवाहन तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी केले आहे.श्रीगोंदा तालुक्यातील विविध संघटना, विक्रेते, व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या जनता कर्फ्युचे पालन करावे. रुग्णसंख्या वाढत आहे. आपण काळजी घेतली नाही तर आपल्यावरदेखील वाईट वेळ येऊ शकते. कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका, प्रशासनाला सहकार्य करावे.प्रदीपकुमार पवार, तहसीलदार श्रीगोंदा
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे