पुणे ग्रामीण दि २२ : – वडगाव मावळ परिसरातील वाहनगाव येथील फार्म हाऊसच्या मॅनेजरवर दोघांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मॅनेजर गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिलिंद माणेरीकर (वय 45) असे गोळीबारात जखमी झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ परिसरात वाहनगाव येथे संकल्प फार्म हाऊस आहे. त्याठिकाणी मिलिंद हे मॅनेजर आहेत. दरम्यान आज 11 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या.यात एक गोळी पोटाला लागली आहे. यात त्यांचा रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला. त्यांना तात्काळ येथील पवन हॉस्पीटल येथे दाखल केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. त्यांचा शोध वडगाव मावळ तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांकडून सुरू करण्यात आला आहे. नाकाबंदी करत पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान हल्ला कोणत्या कारणाने झाला हे समजू शकलेले नाही. अधिक तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.