वैजापुर दि २२:- प्रतिनिधी वैजापूर शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असुन मंगळवारी शहराच्या विविध भागात तब्बल ६४ नविन रुग्ण आढळुन आल्याने रुग्णसंख्या २६८ पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे प्रशासनाने करोनाचा सामाजिक संसर्ग (कम्युनिटी स्प्रेडिंग) टाळण्यासाठी रँपिड अँटीजेन टेस्ट ही मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक प्रभागाला शंभर टेस्टिंग किट देण्यात येणार असुन या किटच्या सहाय्याने नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. सध्या सावित्रीबाई फुले प्रशाला व पंचशीलनगर परिसरातील एका मंगल कार्यालयात अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे अशी माहिती तहसिलदार निखिल धुळधर यांनी दिली. तहसिलदार धुळधर, आरोग्य अधिकारी, उपनगराध्यक्ष साबेरखान, मुख्याधिकारी भागवत बिघोत, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत मंगळवारी शंभर नागरिकांची तपासणी करण्यात आली. शहरातील फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदारांसह सर्व व्यापारी, बँक अधिकारी व कर्मचारी, नगरसेवक यांची या मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात येणार असुन चाचणीचे निदान लवकर होणार असल्याने करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यास प्रशासनाला सोपे जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी ही तपासणी करावी व करोना पॉझिटिव्ह रुग्णांनी उपचार करुन घ्यावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सोमवारी करोना रुग्णांची संख्या १९६ होती. मंगळवारी शहरातील दुर्गावाडी, मोंढा मार्केट, फुलेवाडी रोड, इंदिरानगर, कुंभार गल्ली, अहिल्याबाईनगर, देशपांडे गल्लीमध्ये, पंचशीलनगर व शिऊर येथे असे ६४ नविन रुग्ण आढळुन आले. त्यामुळे आता रुग्णसंख्या २६० झाली आहे. पंचशीलनगर मध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने हा भाग करोनाचा हॉटस्पॉट झाला असुन प्रतिबंधित करण्यात आला आहे. २१७ पैकी १११ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत करोनामुळे तालुक्यात पाच जणांचा मृत्यु झाला आहे. शहरी व ग्रामीण भागातील १६४० नागरिकांच्या स्वँबची तपासणी करण्यात आली असुन त्यातील १७८ पॉझिटीव्ह व १३६१ निगेटिव्ह आढळुन आले आहेत. सध्या करोनाच्या १२३ केसेस असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोमवार अखेरपर्यंत २४० जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी २२१ जणांचे अहवाल निगेटीव्ह असुन १८ जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वैजापुर प्रतिनिधी :- गणेश सिताराम ढेंबरे