पुणे दि १६ : -जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या पुढाकाराने पत्रकार बांधवांसाठी ऑनलाईन वेबसाईट डिझाईन कोर्सचे आज उद्घाटन करण्यात आले. कौशल्य विकास प्रशिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पुण्यातील यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या सहकार्याने पत्रकार बांधवांसाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला असून यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचेही सहकार्य लाभले आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्राध्यापक योगेश बराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पत्रकारबांधव व त्यांच्या कुटुंबियांना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वेबसाईट डिझाईनचे कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी प्रसाद कुलकर्णी यांनी नमूद केले. तर सध्या उपलब्ध असलेल्या रोजगार साधनांवरच अवलंबून न राहता प्रत्येकाने नवनवीन कौशल्य आत्मसात करून आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करायला हवा असे मत ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. तसेच पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम खूपच लाभदायक ठरेल असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्राध्यापक योगेश बोराटे यांनी व्यक्त केला. पुढील दहा दिवस चालणाऱ्या या उपक्रमाच्या पहिल्या बॅचसाठी तीस जणांनी नाव नोंदणी केली आहे. यशस्वी संस्थेच्या शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.सुनिता पाटील व प्रा. वैशाली भुसारी या प्रशिक्षक म्हणून काम पाहत असून तांत्रिक बाबींसाठी पत्रकार संघाचे सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे यांचे सहकार्य लाभले आहे.