पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सेक्टर क्र. २३ येथील स्थापत्य व विद्युत विषयक कामे तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणी वितरण व्यवस्थेतील देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी वेळोवेळी यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्यानुसार ही कामे नियोजित करण्यात आली आहेत.
या बंदमुळे सोमवार, दि. २३/०२/२०२६ रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व भागांचा संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. तसेच मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
नागरिकांनी बंद कालावधीत आवश्यक तेवढा पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पाणीपुरवठ्यातील या तात्पुरत्या अडचणीबाबत नागरिकांनी समजून घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी केले आहे.
