पुणे,दि२५ :- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यामध्ये विनामूल्य रुग्णवाहिका सेवा देणा-या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या रुग्णसेवा अभियानात ११ वी रुग्णवाहिका दाखल झाली. निम्हण कुटुंबियांकडून तिस-या रुग्णवाहिकेचे ट्रस्टला देणगी मिळाली असून कोविडसह इतर सर्व अत्यावश्यक सेवांकरीता या रुग्णवाहिका रुग्णसेवेत कार्यरत असणार आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्या विश्वस्तांकडे निम्हण परिवारातर्फे रुग्णवाहिका प्रदान व पूजन कार्यक्रमाचे आयोजन सोमेश्वरवाडी पाषाण येथील गोविंदा गार्डन मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी खासदार गिरीश बापट, माजी कृषीमंत्री शशिकांत सुतार, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, अशोक पवार, अतुल बेनके, रमेश थोरात, वसंतदादा शुगरचे संचालक शिवाजीराव देशमुख, विनायक निम्हण, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, चेतन लोढा, आयोजक यशवंत निम्हण, हेमंत निम्हण यांसह निम्हण कुटुंबिय उपस्थित होते.
कै.एकनाथ (आबा निम्हण) यांच्या ५० व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आणि पुण्याचे माजी उपमहापौर शंकरराव निम्हण यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही रुग्णवाहिका ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आली आहे. यापूर्वी निम्हण कुटुंबियांकडून कै.गोविंदराव एकनाथ निम्हण यांच्या स्मरणार्थ दोन रुग्णवाहिका ट्रस्टला देणगी म्हणून देण्यात आल्या आहेत.
ट्रस्टचे महेश सूर्यवंशी म्हणाले, ट्रस्टच्या रुग्णसेवा अभियानात आज आणखी एका रुग्णवाहिकेचे भर पडली असून आता एकूण ११ रुग्णवाहिका ट्रस्टकडे आहेत. निम्हण कुटुंबियांनी यापूर्वी दिलेल्या रुग्णवाहिका कोविड काळात देखील अहोरात्र रुग्णसेवेकरीता कार्यरत होत्या. यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले.
ट्रस्टतर्फे शहर, उपनगर, जिल्हा व गरजेनुसार महाराष्ट्रामध्ये जाण्याकरीता रुग्णवाहिकांची सोय आहे. पुणे शहराकरीता या रुग्णवाहिका विनामूल्य सेवा देत आहेत. तर, पुण्याबाहेर महाराष्ट्रात कोठेही जाण्याकरीता डिझेल खर्चात ही सेवा उपलब्ध करुन दिली जात आहे. सुसज्ज अशा रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत २४ तास उपलब्ध आहेत. आता यामध्ये ११ व्या रुग्णवाहिकेची भर पडली असून नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्या विश्वस्तांकडे निम्हण परिवाराच्या तर्फे रुग्णवाहिका प्रदान व पूजन कार्यक्रमाचे आयोजन सोमेश्वरवाडी पाषाण येथील गोविंदा गार्डन मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवर.